राजाराम बंधार्यावरून कार पंचगंगा नदीत कोसळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1rajaram_0.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|
वडणगेहून कसबा बावड्याच्या दिशेने येणारी कार राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीत कोसळली. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. कारचालक जयजीत श्रीकांत भोसले (वय ३९, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) हे पोहत काठावर पोहोचल्याने बचावले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, नदी पात्रातून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कारचालक जयजीत भोसले हे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास वडणगेहून कसबा बावड्याच्या दिशेने येत होते. राजाराम बंधाऱ्यावरील अरुंद रस्त्यावर आल्यानंतर समोरून आलेल्या वाहनांना बगल देताना अंदाज चुकल्याने त्यांची कार नदी पात्रात कोसळली. पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने कार पाण्याबरोबर वाहत निघाली.
हा प्रकार लक्षात येताच नदीकाठावरील लोकांनी धाव घेतली. कार चालक भोसले यांनी वेळीच कारचा दरवाजा उघडून पाण्यात उडी घेतली. काही अंतर पोहून ते काठापर्यंत पोहोचले. काठावर थांबलेल्या लोकांनी त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. पाण्याच्या प्रवाहामुळे कार सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहत पुढे गेली. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस राजाराम बंधाऱ्यावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत कार पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.