कोरोनाच्या नावाखाली काळा बाजार करणा-याची तक्रार राष्ट्रवादीकडे करा – राजू मिसाळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Raju-Misal-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. असे प्रकार होत असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल. त्यासाठी नागरिकांनी असे प्रकार घडत असतील तर त्याची तक्रार थेट राष्ट्रवादीकडे करावी, असे आवाहन महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही रुग्णांलयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन बाहेरुन आणावे लागत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. अशावेळी त्यांना महागडी औषधे व इंजेक्शन बाहेर खरेदी करावी लागत असल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांस बाहेरून औषधे किंवा इंजेक्शन आणण्यास सांगितल्यास त्याबाबत महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टी कार्यालयात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नगरसदस्याकडे व शहरातील कोणत्याही राष्ट्रवादी पदाधिका-यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी, त्याची योग्य दखल घेतली जाईल. औषधांचा व इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या कोणत्याही दर्जांच्या हॉस्पिटल, मेडीकल व डॉक्टरांची गय केली जाणार नाही, असे आवाहन विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.