शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रपासून तोडणारी ताकद यशस्वी होत नाही- खासदार संजय राऊत

मुंबई: महारष्ट्रात शिवसेना आणि मराठी माणूस आहे म्हणून मंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची शक्ती यशस्वी होत नाहीत. शिवसेना आणि मराठी माणूस यांच्या एकोप्यामुळेच महाराष्ट्र आणि मुंबई विरोधी ताकद यशस्वी होत नाही, असे रोखठोक विधान शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. दाऊद इब्राहीम याच्याबाबत आम्हाला सांगू नये. शिवसेनेने दाऊदसोबतचा लढा दिलेला आहे. आपण म्हणता तसे मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत. प्रामुख्याने ती झोपडपट्टी, चाळ अथवा गरीब, मध्यमवर्गीय लोकांची आहेत. पण हे लोक मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणत नाहीत. महाराष्ट्रावर टीका करत नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावलेला आहे.
त्यासोबतच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणारी ताकद कार्यरत आहे. हे सर्वांना माहिती आहे. किमान मराठी प्रसारमाध्यमांनी तरी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये, असेही राऊत म्हणालेले आहेत. ज्यांचा मुंबई, महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. देणंघेणं नाही. असे लोक महाराष्ट्र आणि मुंबई विषयी बोलत आहेत. हे मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस कसे सहन करेन? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. कंगना राऊत किंवा इतर विषय हे अगदी छोटे आहेत. त्याला फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. हा विषय शिवसेनेसाठी संपला आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.





