MSEB: राष्ट्रवादीचे नगरसेवक यश साने यांचे प्रशासकीय अज्ञान चव्हाट्यावर!
चिखलीतील माऊली सोसायटी येथे महावितरण केबल कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न : आमदार निधीतून काम झाल्याचा दावा, पण महावितरणचे पत्र सांगते... 'निधीच आलेला नाही'

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : चिखली-मोरेवस्ती परिसरातील माऊली सोसायटीजवळील भूमिगत एलटी केबल बदलण्याच्या कामाचे श्रेय घेत राष्ट्रवादीचे नगरसेवक यश साने यांनी हे काम आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदार विकास निधीतून (DPDC) मंजूर झाल्याचा दावा करत प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी मिळवली होती. मात्र या दाव्याला महावितरणच्याच अधिकृत पत्रव्यवहारातून छेद गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यश साने यांचे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रशासकीय अज्ञान चव्हाट्यावर आले, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दि. ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमीत नगरसेवक साने यांनी २७ मे रोजी आमदार बनसोडे यांच्याकडे निधीची मागणी केली आणि त्यानुसार भूमिगत केबल बदलण्याच्या कामास मंजुरी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. या कामाचा नारळ फोडतानाचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला. वास्तविक, बनसोडे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात आणि ज्या भागात केबल टाकली आहे. तो परिसर भोसरी विधानसभा मतदार संघात येतो.

दरम्यान, भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी याबाबत महावितरण भोसरी विभागाकडे लेखी विचारणा केली असता, कार्यकारी अभियंत्यांनी दि. ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या उत्तरात स्पष्ट नमूद केले आहे की, माऊली सोसायटी परिसरातील लघुदाब वाहिनीची केबल जळाल्यामुळे रोज वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे तांत्रिक दोष शोधून राजगडपार्क येथील ८० मीटर खराब केबल एम्पॅनल एजन्सीमार्फत बदलण्यात आली. हे काम महावितरणच्या दैनंदिन दुरुस्ती कामांतर्गत करण्यात आले असून, “या कामासाठी डी.पी.डी.सी. (DPDC) मार्फत कोणताही निधी महावितरणला वर्ग झालेला नाही” असे पत्रात स्पष्टपणे नमूद आहे.
याशिवाय, दि. ४ ऑगस्ट रोजी साने यांनाच पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात महावितरणने चिखली-संभाजीनगर परिसरासाठी ‘टाऊन डीपीआर’ योजनेअंतर्गत नवीन स्विचिंग स्टेशन, रोहित्र व वाहिन्यांचा जो सविस्तर आराखडा दिला आहे, त्यातही आमदार निधी किंवा DPDC निधीचा कोठेही उल्लेख नाही — हे काम महावितरणच्याच नियमित भांडवली योजनेचा भाग असल्याचे दिसते.
वास्तविक, यश साने हे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे चिरंजीव आहेत. २०२६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना सहानुभूती मिळाली आणि निवडणुकीत यश मिळाले आहे. मात्र, राजकीय आणि प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यामुळे त्यांना महावितरणच्या सदर कामासाठी निधी कोठून मंजूर होतो आणि त्याचे काम कसे केले जाते? याबाबत माहिती नसावी. तसेच, केवळ कोणीतरी सांगितले आणि आम्ही केले, अशा भावनेतून त्यांनी प्रसिद्धी मिळवली असेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
नागरिकांची दिशाभूल झाल्याचा आरोप
या दोन पत्रांची तुलना करता, प्रत्यक्षात झालेले काम हे महावितरणच्या नियमित देखभाल-दुरुस्ती अंतर्गत झालेले असताना, ते आमदार निधीतून विशेष मंजुरी मिळवून करून घेतल्याचे चित्र उभे करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसते. यामुळे परिसरातील नागरिकांची व प्रसारमाध्यमांचीही दिशाभूल झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी या प्रकरणी महावितरणकडे काम-आदेशाची प्रत, अंदाजित खर्च, मंजुरी पत्र व ठेकेदाराचे नाव यासह संपूर्ण कागदपत्रे मागितली असून, याबाबत पुढील माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे. वास्तविक, सदर काम हे देखभाल दुरूस्तीच्या कामांतर्गत करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला निधी मंजूर करण्याची आवश्यकता नाही.
( टीप : या वृत्तासंदर्भात नगरसेवक यश साने यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; त्यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास ते स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.)






