शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; आरोपींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार !
![Praveen Darekar's dominance over Mumbai District Bank ends; Siddharth Kamble wins, Prasad Lad loses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Pravin-Darekar-1.jpg)
मुंबई । माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच पेटत आहे. या प्रकरणानंतर संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांना जामीन मिळाल्याने भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपकडून पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “जोपर्यंत या आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार”,असा इशाराच दिला आहे.
“शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण केली तो प्रकार अतिशय निंदनीय आहे. या निवृत्त अधिकाऱ्याला त्याच्या घरात घुसून मारहाण झाली. मात्र, आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन उघडकीस आणले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज दिले.
आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबतची संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अॅक्टिव्ह झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले मात्र लगेच जामीनावर सोडून दिले. पोलिसांनी या प्रकरणी जी कलमे लावणे अपेक्षित होते ती लावली गेली नाहीत. म्हणूनच, आम्ही हे आंदोलन करत आहोत. संबंधित आरोपींवर योग्य कलमे लावण्यात यावीत हीच आमची मागणी आहे. आता आम्हाला पोलिसांनी कलमं वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याप्रमाणे झाले नाही तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू”, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.