कंगना रनौत प्रकरणात आता राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Bhagat-Singh-Koshyari-Kangana-Ranaut.jpg)
मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशा शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई राज्यपालांना रुचली नाही. त्यामुळे अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी नापसंती दर्शवली आहे.
कोश्यारी या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता आहे. कंगना रनौतची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले होते. “कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आलेले आहे. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मेहता यांना सांगितले” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे.