हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनला कोरोना
लंडन – दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत चालला आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनलादेखील करोनाची लागण झाली आहे. रॉबर्टला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा आगामी चित्रपट ‘द बॅटमॅन’चे अमेरिकेत सुरू असलेले चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.
‘द बॅटमॅन’च्या प्रोडक्शन कंपनीने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले असून तसे पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. ‘द बॅटमॅन’च्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण काही वेळासाठी थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रॉबर्ट पॅटिन्सनने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु काही हॉलिवूड वेबसाईटने रॉबर्ट पॅटिन्सला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
लॉकडाउननंतर ‘द बॅटमॅन’ चित्रपटाचे गेल्या तीन दिवसांपूर्वीच लंडन येथे चित्रीकरण सुरू झाले होते. तसेच चित्रपटाचे आणखी तीन महिन्यांचे चित्रीकरण बाकी असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन आणि त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्याने व्हिडीओ पोस्ट करून याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.