कोरोना केअर सेंटरमधील हाऊसकिपिंग कामासाठी 2 महिन्यात 50 लाखांचा खर्च
![BVG will now supply seedlings to the Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bvg-india-ltd-nerul-navi-mumbai-security-services-mwr17.jpg)
पिंपरी- चिंचवड | पालिकेच्या वतीने कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये बीव्हीजी इंडिया यांच्यामार्फत हाऊसकिपिंगच्या कामासाठी मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. मे आणि जून महिन्यात केलेल्या हाऊसकिपिंगच्या कामासाठी 49 लाख 86 हजार रूपये इतका खर्च झाला आहे.
शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या विचारात घेता शहरात भविष्यात रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूमुळे शहरात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने बालेवाडी क्रीडा संकुल आणि आकुर्डीतील पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत हाऊसकिपिंगच्या कामासाठी मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. तथापि, बीव्हीजी इंडीया यांनी पूर्वी सादर केलेल्या दराऐवजी किमान वेतन कायद्यानुसार मनुष्यबळ पुरविण्याची तयारी दर्शविली.
महापालिकेतर्फे बालेवाडी क्रीडा संकुल, आकुर्डीतील पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज, ताथवडे येथील बालाजी लॉ कॉलेज, रावेतमधील डी. वाय. पाटील मुलींचे वसतीगृह, बीएसएनएलचे महिला वसतीगृह, मोशीतील मुलांचे वसतीगृह, इंद्रायणीनगर येथील मुलींचे वसतीगृह याठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे बीव्हीजी इंडिया यांच्यामार्फत मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. बीव्हीजीच्या कर्मचा-यांना किमान वेतन दरानुसार वेतन देण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. तथापि, बीव्हीजी इंडिया यांनी कर्मचा-यांना साफसफाईसाठी आणि स्वच्छतेसाठी आवश्यक लागणारे केमिकल आणि साहित्य पुरविण्यात आले आहे. त्यासाठी झालेला खर्च मिळावा, अशी मागणी बीव्हीजी इंडिया यांनी केली आहे.