संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
परभणी | शिवसेनेचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर परभणीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिलाय. संजय जाधव यांच्या नाराजीचा केंद्रबिंदू राहिलेल्या जिंतूर-मानवत बाजार समिती अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा स्थगिती आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिंतूर-मानवत बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनी हा स्थगिती आदेश दिला. 25 ऑगस्टला संबंधित अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर परभणी शिवसेनेतून याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कार्यकर्त्यांची नाराजीचं कारण देत खासदार संजय जाधव यांनी देखील आक्रमक होत आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. यानंतर राज्याच्या राजकारणातही महाविकासआघाडीतील मतभेदाच्या चर्चेला उधाण आलं.
राजीनामा नाट्यानंतर स्वतः शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत संजय जाधव यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांची मुख्यमंत्र्यांशी देखील भेट करुन दिली. मुख्यमंत्र्यांनी संजय जाधव यांच्या अडचणी समजून घेत त्यांची नाराजी दूर केली. आता या निर्णयाने उद्धव ठाकरे यांनी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचं बोललं जात आहे.