के. एस. ऑईलच्या संचालकांवर गुन्हे; एसबीआयला ९३८ कोटींना फसवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-48-1.jpg)
नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील मोरेना येथील के. एस. आईल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेशचंद्र गर्ग यांच्यासह तीन संचालकांवर सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर दिल्ली आणि मोरेना येथील कंपनीचे कार्यालय व त्यांची निवासस्थाने अशा ५ ठिकाणांवर धाडी टाकून तपासणी केली. अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
के. एस. आईल कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय मध्य प्रदेशातील मोरेना येथे आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रमेशचंद्र गर्ग आणि कंपनीचे संचालक सुभाष गर्ग यांची कार्यालये आणि निवासस्थाने दिल्लीतील बारा खांब रोडवर आहेत. त्यांच्या या घरांवर आणि कार्यालयांवरही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे घालून तपासणी केली. या कंपनीचे आणखी एक संचालक दिवेश आगरवाल यांच्याविरोधातही सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. मात्र त्यांच्या घराची सीबीआयने झडती घेतलेली नाही. कंपनीच्या ताळेबंदात ऑडिटरला आढळलेल्या काही त्रुटी आणि कंपनीच्या कर्जाच्या रकमेत केलेली गफलत यामुळे त्यांच्यावर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सीबीआयचे आर. के. गौर यांनी सांगितले.