कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीकडून सुशांतचा गौरव
मुंबई : सुशांतसिंह राजपूतने अत्यंत कमी कालावधीत अनेक विविध विषयांचे चित्रपट केले. यात आवर्जून उल्लेख करण्याजोगे काय पो छे, एम.एस धोनी, केदारनाथ, सोनचिडिया आदी सिनेमांचा समावेश होतो. अत्यंत कमी वयात विविध विषय हाताळलेला कलाकार म्हणून कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने सुशांतचा गौरव केला आहे. त्याने सिनेमासृष्टीत दिलेलं योगदान आणि त्याची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्याची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने इन्स्टावर या प्रमाणपत्राचा फोटो टाकून त्यांचे आभार तर मानलेच. शिवाय, कॅलिफोर्निया आमच्यासोबत आहे आणि तुम्ही? असा प्रश्नही विचारला आहे.
सुशांतसिंह राजपूतचा 14 जून रोजी मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी त्याची नोंद आत्महत्या अशी केली असली तरी ती आत्महत्या नसून हत्या आहे असा नवा सूर सध्या ऐकू येतो आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी यात आता ईडीही उतरलं आहे. एकीकडे बिहार पोलिसांकडे सुशांतच्या कुटुंबियांनी केलेले खुलासे आणि मुंबई पोलिसांना दिलेले जबाब अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सध्या सुशांतचा तपास चालू आहे.