मुंबईकरांनो, ‘या’ तारखेला गरज असेल, तरच घराबाहेर पडा !
मुंबई : उत्तर कोकण, म्हणजे मुंबई, रायगड आणि ठाणे या भागात 8, 9 आणि 10 जूनला अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे या तारखेला गरज असेल, तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
येत्या काळात पाऊस किती असेल, याची झलक काल मुंबईत झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसातच पाहायला मिळाली. आता 8, 9 आणि 10 तारखेला मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, 8, 9 आणि 10 तारखेला साडेचार मीटर पेक्षा कमी भरती आहे, त्यामुळे धोका कमी असल्याचेही हवामान विभागाने सांगितले.
मुंबईसह राज्यातील विविध भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील हिंदमाता, मलबार हिल भागात पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं. ठाणे आणि नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हवेत गारवा निर्माण झाल्याने अखेर उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.