सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/sushant-singh-rajput-rhea-chakraborty-were-set-to-shoot-their-first-film-together-confirms-director-0001.jpg)
मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ‘रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले’, असा आरोप सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांचे ज्युनियर वकील काल रात्री रियाच्या घरी गेले होते. त्यामुळे रिया आता न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे बिहारमधून चार पोलिसांचे पथकही मुंबईत दाखल झाले असून ते या प्रकरणाची चौकशी करतील.
सुशांतच्या वडिलांनी 25 जुलै रोजी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसेच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचे सांगत त्याला ते सोडायला लावले होते.