वाढदिवसाच्या दिवशी मैत्रिणीला घरी बोलावलं, अन्ं तिचे फोटो केले व्हायरल
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
वाढदिवसाच्या दिवशी मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यासोबत फोटो काढून ते तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल करून पैशांची मागणी करणा-यास देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
प्रशांत ऊर्फ बफन धर्मा लांडगे (वय २१, रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांचे मैत्रीचे संबंध होते. मात्र, फिर्यादी यांनी ते मे महिन्यापासून तोडले होते. तरीदेखील आरोपी पीडित अल्पवयीन मुलीला सतत फोन करून त्रास देत असे. पीडितेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे फिर्यादींना समजल्यानंतर त्यांनी त्याबाबत मुलीला विचारणा केली. तेव्हा मुलीने सांगितले, मार्च महिन्यात आरोपीचा वाढदिवस होता.
आरोपीने पीडितेला वाढदिवसाकरिता बोलावले. मात्र, तिने घरचे पाठवत नसल्याचे सांगितले. या वेळी आरोपीने खूप विनवणी केल्याने ती मुलगी आरोपीकडे गेली. या वेळी तिने आरोपी व तिच्या मैत्रिणीची भेटदेखील घेतली. याप्रसंगी आरोपीने गाडीत तिच्यासमवेत काही फोटो काढले व ते मुलीच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल केले. मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन केले. तसेच आपल्याला पैशांची गरज असून, पैसे मिळाले नाही तर आपले एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.