चिंताजनक! पुण्यातील चार धरणात 33 टक्के पाणीसाठा, पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/860652809Pune_Khadakwasla_Dam_Main.jpg)
पुणे: यंदा पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर हे पाणीकपातीचं संकट आलं आहे. धरण प्रकल्पातील चारही धरणात यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झालेला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने 12 दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मात्र, मागीलवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी कमीच आहे.
असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. तर दौंड इंदापूर आणि बारामतीला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र पावसाचं प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. अशास्थितीत पाणी कमी असल्याने खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आलं नाही.
गेल्यावर्षी 4 धरणांमध्ये एकूण 16.74 टीएमसी म्हणजेच 57.43 टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा 9.86 टीएमसी म्हणजेच 33.82 टक्के आहे. खडकवासला 41.01 टक्के, पानशेत 39.95 टक्के, वरसगाव 31.77 टक्के, टेमघरमध्ये 19.44 टक्के पाणी साठी आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. मात्र, हा निर्णय ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच ठरणार आहे.