#CoronaVirus: पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन
पुणे : पुण्यात ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. आता कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात देखील झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा या दोन तालुक्यांत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसे आदेश देण्यात आलेले आहे. आजपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता काम नसताना घराबाहेर देखील पडता येणार नाहीये. आजपासून भोर आणि वेल्हा या दोन तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे असून तो ३१ जुलैपर्यंत असणार आहे.
मागील काही दिवसांपासून या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून भोर प्रशासनाने ३१ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्ही तालुक्यातून बाहेर जाण्यासही बंदी घातलेली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी असणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस भोर वेल्हा परिसर हा संपूर्ण पणे बंद असणार आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु असली तरी मास्कशिवाय कोणाला घराबाहेर पडता येणार नाहीये.