भारतात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखाच्या पलिकडे गेला आहे. त्यातच आता भारताची काळजी वाढवणारी माहिती समोर येत आहे. भारतात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आयएमएचे प्रमुख व्ही. के. मोंगा यांनी म्हटलं, “भारतात कोरोना आता धोकादायक वेगाने वाढत आहे. दररोज जवळपास 30 हजार रुग्णांची नोंद होत आहे. भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना संसर्ग आता भारताच्या अगदी ग्रामीण भागातही पोहचला आहे. हे भारतासाठी चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावरुन समुह संसर्गाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.”