सांगली जिल्ह्यात 19 तारखेपासून 100% लॉकडाऊन, जयंत पाटलांनी केला हा खुलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/24bmpunepolice-the-hindu-pune-police-lockdown-cropped-1-1585551456-cropped-2-1590989486.jpg)
सांगली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सांगली जिल्ह्यात मंगळवार ( दि. 21) पासून शंभर टक्के लॉकडाऊन जाहीर होणार आहे. अशा आशयाचे मेसेज पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही. तथापि, दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबतच्या संबंधित नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी गुरुवारी (दि. 16) झूमद्वारे संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची, सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोर अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात मंगळवार (दि. 21)पासून 31 जुलैपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन होणार, अशा आशयाच्या कोणत्याही बातम्यांवर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
त्याच वेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लॉकडाऊन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.