एकाच परीक्षा केंद्रावरील 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture897.jpg)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तसेच दहावी- बारावी च्या विद्यार्थ्यांचे राहिलेले पेपर रद्द करून त्यांना सरासरी गुणांच्या आधारे त्यांचे निकाल लावण्यात आले. मात्र कर्नाटक सरकारने या परिस्थितीला गांभिर्याने न घेता कोरोना संकटाच्या सावटाखाली कर्नाटकमध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्यातही आली होती. मात्र परिणामी एका परीक्षा केंद्रावरील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. कर्नाटक सरकारने याबद्दलची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या ८० विद्यार्थ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कोरोनामुळे शालेय अभ्यासक्रमांपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत सर्वच परीक्षांचं वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार, दररोज वाढणारी रुग्णसंख्या यामुळे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयासह अनेक राज्यांकडून महत्त्वाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती असल्यानं अनेक राज्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारने मार्च एप्रिलमध्ये होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलून २५ जून ते ३ जुलै या कालावधीत घेण्याचे निश्चित केले होते. ही परीक्षा पूर्ण झाली असून, एका परीक्षा केंद्रावरील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.सरकारनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ३ हजार ९११ विद्यार्थ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यानं त्यांना परीक्षा देता आली नाही. त्याचबरोबर ८६३ विद्यार्थी प्रकृती बरी नसल्याने गैरहजर होते.