कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/FB_IMG_1592482516265.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतल्या गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम ॲपद्वारे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
दरवर्षीची परंपरा कायम ठेवत मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आज सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले. तसेच भक्तांची गर्दी टाळण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची मोहीम राबवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी झूम ॲपद्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य शासनातर्फे लवकरच नियमावली जाहीर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. डेंग्यू-मलेरिया सारख्या साथीच्या आजारांप्रमाणेच कोरोनाच्या लढाईतही जनजागृती करत गणेशभक्त चांगली साथ देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले.
आषाढी एकादशीनिमित्त यावर्षी विठ्ठल-रुखुमाईचे दर्शन ऑनलाइन होणार आहे. त्याच धर्तीवर गणेशोत्सव मंडळानीदेखील ऑनलाईन दर्शनाची मोहीम राबवण्याचे आवाहन ना. अजित पवार यांनी केले. गणेशभक्त समाजात जनजागृती करत असून ते कोरोना योद्धे असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
या बैठकीत गृहमंत्री ना. अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार- पक्ष सचिव अनिल देसाई, माजी मंत्री लीलाधर डाके, आमदार अजय चौधरी, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष दहिबावकर, जयेंद्र साळगावकर, मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनीही सहभाग घेतला.