ओवेसींचा मोदी सरकारला सवाल; चीनने आपला प्रदेश बळकावलाय का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/modi-owaisi.jpg)
गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील सीमेवरून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. दरम्यान. भारत आणि चीनदरम्यान लष्कराच्या पातळीवर चर्चा करण्यात आली. तसंच त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानंही यापुढेही शांततापूर्ण मार्गानं चर्चा सुरू राहणार असल्याचं म्हटलं होतं. आता या प्रकरणावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “चीनसोबत कोणती चर्चा झाली याची माहिती केंद्र सरकारनं द्यायला हवी. ते शांत का आहेत?,” असा सवाल ओवेसी यांनी केला.
“जर चीननं जर आपला प्रदेश बळकावला नाही, तर सरकार त्यांच्याशी काय चर्चा करत आहे. देशाला याची माहिती मिळाली पाहिजे. केंद्र सरकारनं याबाबत माहिती द्यायला हवी. सरकार शांत का आहे?,” असं ओवेसी म्हणाले. दरम्यान यावेळी करोनाच्या संकटावरही भाष्य केलं. “केंद्र सरकारनं लागू केलेला लॉकडाउन अयशस्वी झाला आहे. आज देसात तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णसंख्या झाली आहे. गुजरातची परिस्थितीही खराब आहे,” असंही ते म्हणाले.
Our Army & PLA are talking to each other. Central Govt should tell the country what they are talking to the Chinese. Why are they embarrassed & maintaining silence? Can they tell us whether the Chinese military has occupied Indian territory in Ladakh: AIMIM Chief Asaduddin Owaisi pic.twitter.com/JTv2wnPUjO
— ANI (@ANI) June 8, 2020
दरम्यान आजपासून देशभरातील अनेक ठिकाणी अनलॉक १.० ची सुरूवात झाली आहे. या काळात लोकांनी आपली काळजी घ्यावी असे ओवेसी म्हणाले. तसंच हैदराबादमधील सर्वच धार्मिक स्थळांना सॅनिटाझर डिस्पेन्सिंग मशीन देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. “स्वत:ला यातून सुरक्षित ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. तसंच लोकांनी सतत हातही धुत राहावं. करोना म्हणजे कोणता सामान्य ताप नाही. याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. जर आजारी पडलो तर थेट रूग्णालयातही गेलं पाहिजे,” असं ओवेसी म्हणाले.