धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये कार-ट्रकच्या अपघातात एकाच परिवारातील ९ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/image-1.png)
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील ९ जणांना आपले प्राण गमवावे लागेल आहेत. शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजिदपूर गावाजवळ सकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ९ जणांनी आपले प्राण गमावले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
राजस्थानच्या भिवाडी गावातील एकाच परिवारातील १० लोकं SUV गाडीमधून बिहारमधील भोजपूरच्या दिशेने प्रवास करत होते. घरगुती कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी प्रवास करत होती. प्रतापगडमध्ये SUV कारने ट्रकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार टायर फुटल्यामुळे किंवा सकाळच्या वेळात चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवाबगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशुतोष त्रिपाठी यांनी माहिती दिली.
स्थानिक गावकऱ्यांनी या अपघाताविषयी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातातात ९ लोकं जागीच मृत्यूमुखी पावली असून त्यांचे मृतदेह रुग्णालयात पाठण्यात आलेले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.