#CoronaVirus: दिवशी कोरोनाचे ८ हजार ३८१ रुग्ण ठणठणीत बरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/test-3.gif)
मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव होत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करण्यात यश मिळत आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला. एकाच दिवशी ठणठणीत बरे झालेल्या ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.