लाचार काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/vikhe-patil-Frame-copy.jpg)
अहमदनगर : “काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. सरकारमध्ये असूनही निर्णय घेण्याचा अधिकार तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी”, असा हल्लाबोल भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं विधान दुटप्पीपणाचं असल्याची टीका केली.
राहुल गांधी यांनी काल (26 मे) पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या विधानामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. “आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही”, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्यानंतर त्यांनी आज (27 मे) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बातचीत केली. यावेळी “कोरोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात कोरोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करु”, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. “राहुल गांधींचं विधान दुटप्पीपणाचं आहे. एकीकडे सरकारमध्ये राहायचं आणि दुसरीकडे सांगायचं आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही मग तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबलात?”, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
“काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवा. काँग्रेसची अवस्था डबलढोलकी सारखी झाली आहे”, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
“अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुभाव वाढत असताना काँग्रेसचे मंत्री मुंबईत जावून का थांबले आहेत? राज्यातील जनता हवालदिल झाली असताना मंत्री गायब आहेत. राज्याच्या या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसही तेवढीच जबाबदार आहे”, अशीदेखील टीका विखे पाटील यांनी केली.