#CoronaVirus:विवाहातील खर्च टाळून दोन हजार गरिबांना मोफत ‘शिवभोजन थाळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200526_120841.jpg)
लातूर : कोरोना संकटाच्या काळात लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे जाधव- हलगरकर परिवारात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. कोरोनामुळे अनावश्यक भोजन, डेकोरेशन, सभागृहावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात टळला. त्यामुळे यातून गरीब, मजुरांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत भोजन देण्याचा संकल्प वर पक्षाकडील जाधव कुटुंबीयांनी केला.
त्यातून दोन हजार जणांना ०५ रुपये थाळीप्रमाणे मोफत शिवभोजन देण्यासाठीचा खर्च जाधव कुटुंबीयांनी उचलला. लग्न लागल्यानंतर त्यांनी निलंगा येथील शिवभोजन थाळीच्या हॉटेल व्यवस्थापकांकडे १० हजार रुपयांचा धनादेश नववधू-वरांच्या हस्ते सुपूर्द केला. यातून दोन हजार गरीब, शेतमजुरांना पुढील काही दिवस मोफत भोजन मिळू शकणार आहे. कोरोनामुळे भोजनावर होणार खर्च टळल्यामुळे अशा पद्धतीने सामाजिक दृष्टिकोन ठेवून ही मदत केल्याचे वर बंधू एम.एम. जाधव यांनी सांगितलं.