#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचा झोपडपट्ट्यांतून गावठाणात शिरकाव; नव्या १८ रूग्णांची भर
सोलापुरात गुरूवारी करोनाबाधित १८ नव्या रूग्णांची भर पडून एकूण रूग्णसंख्या ४८८ वर पोहोचली. यात ३४ मृतांचा समावेश आहे. आतापर्यंत झोपडपट्ट्यांमध्ये असलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता गावठाण भागातही होऊ लागल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी शहरातील मध्यवर्ती गावठाण भागात करोनाशी संबंधित संशयित रूग्ण आढळून आले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार होत आहेत. पत्रा तालीम परिसरातील एका व्यक्तीला ‘सारी’ची लागण झाल्यानंतर तिला रूग्णालयात हलविले असता करोनाचाचणी घेण्यात आली. यात संबंधित व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिका आरोग्य प्रशासनाने पत्रा तालीम परिसरात औषध फवारणी केली. तसेच लगतच्या बाळीवेशीतही करोनाबाधित पुरूष आढळून आला. बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ या भागात रूग्ण सापडण्याची मालिका सुरूच आहे.
काल बुधवारी करोनाबाधित नवे १४ रुग्ण सापडले होते. तर तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरूवारी दुसऱ्या दिवशी १८३ चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात १८ करोनाबाधित रूग्ण सापडले. यात १० पुरूष व ८ महिलांना करोनाने बाधित केले. यातील ११ जणांना ‘सारी’ची लागण झाली आहे. दुसरीकडे आज एकाच दिवशी ३५ रूग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत २१० रूग्ण करोनामुक्त होऊन रूग्णालयातून घरी गेले आहेत. सध्या २४४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये बहुतांशी प्रतिकार शक्ती नसलेल्या मधुमेह, रक्तदाब व अन्य आजारांनी पछाडलेल्या वृद्धांची संख्या जास्त आहे.





