उत्तराखंडमध्ये भीषण बस अपघात; १०० मीटर खोल दरीत बस कोसळून ८ ठार, २६ जखमी

Uttarakhand Bus Accident | उत्तराखंडमधील हृषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण बस अपघात झाला. गुलजार बाजार (गुलर बाजार) परिसरातील पुलावरून प्रवाशांनी भरलेली एक बस जवळपास १०० मीटर खोल दरीत कोसळून नाल्यात पडली. या हृदयद्रावक दुर्घटनेत ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ हृषिकेशमधील एम्स (AIIMS) सह विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, विश्वनाथ सेवा संस्थेची ही बस ३४ प्रवाशांना घेऊन हरिद्वारहून कर्णप्रयागच्या दिशेने जात होती. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बस हरिद्वारहून निघाली होती; मात्र त्यानंतर अवघ्या तासाभरात गुलर बाजाराजवळील पुलावरून ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाने हृषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा
शैक्षणिक वर्ष २०२७ मध्ये २१ सीईटी परीक्षा, ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी; मंत्री चंद्रकांत पाटील
उत्तराखंडमध्ये भीषण बस अपघात! आठ जणांचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी
उत्तराखंडमध्ये हृषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण बस अपघात झाला.
#Uttarakhand #BusAccident #UttarakhandAccident #Rishikesh #BadrinathHighway #RoadAccident #BreakingNews #AccidentNews https://t.co/vRyexBEGbJ
— Mahaenews । महाईन्यूज (@mahaenews_) November 17, 2026
एसडीआरएफ आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच ब्यासी आणि ढालवाला येथे तैनात असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेऊन कमांडंट अर्पण यदुवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त पथकेही पाचारण करण्यात आली. दरीत अडकलेल्या सर्व २६ जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बृजेश भट्ट यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे.
जखमींमध्ये देशभरातील विविध राज्यांतील प्रवाशांचा समावेश
प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, जखमी प्रवाशांमध्ये उत्तराखंडसह झारखंड (दुमका), बिहार (पाटणा, जहानाबाद), आसाम (गुवाहाटी), पश्चिम बंगाल (कोलकाता), दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, जसपूर, खटीमा आणि पिथौरागढ येथील रहिवासीही जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, जखमींमध्ये गुवाहाटी येथील अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीचा आणि हल्द्वानी येथील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचाही समावेश आहे; तर एका अज्ञात प्रवाशाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.




