बच्चन पिता-पुत्रांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! गोल्डी ढिल्लोंच्या नावाने व्हायरल पोस्ट; मुंबईत २०० साथीदार सक्रिय असल्याचा दावा

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड गोल्डी ढिल्लों याच्या नावाने सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका पोस्टमध्ये मुंबईत आपले २०० साथीदार सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. बच्चन पिता-पुत्राला बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण असले तरी त्यांना लक्ष्य केले जाईल, असा थेट इशारा या पोस्टमधून देण्यात आला आहे. मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कथित कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावल्यानंतर ही पोस्ट समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
पंजाबी भाषेत इंग्रजी लिपीचा (रोमन लिपी) वापर करून लिहिलेल्या या पोस्टमध्ये १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करण्यात आला आहे. या दंगलींना जबाबदार असलेल्यांना आणि शीख समुदायाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा देतानाच अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असली तरी बच्चन यांना लक्ष्य करण्याची योजना थांबलेली नाही, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, या पोस्टची सत्यता आणि ती प्रत्यक्षात कोणी प्रसिद्ध केली, याची अद्याप स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
हेही वाचा
उत्तराखंडमध्ये भीषण बस अपघात; १०० मीटर खोल दरीत बस कोसळून ८ ठार, २६ जखमी
दिल्ली पोलिसांकडून दोन संशयितांना अटक
या प्रकरणाचे धागेदोरे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने विकस ठाकूर ऊर्फ विकी (रा. जालंधर, पंजाब) आणि दीपक सिंह ऊर्फ दीप (रा. तरनतारन, पंजाब) या दोघांना अटक केली होती. दिल्लीतील एका व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबार करण्याचा कट आणि मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याच्या कथित कटाचा या दोघांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. दीपक हा मुंबईत लपून बसला होता आणि त्यालाच बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘जलसा’बाहेर बुलेटप्रूफ काचेचा वापर
बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याला यापूर्वीही २३ ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबर रोजी धमकीच्या ई-मेलद्वारे लक्ष्य करण्यात आले होते. या ई-मेलमध्ये जलसा बंगल्यासह मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख होता. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी रविवारी चाहत्यांच्या भेटीसाठी घराबाहेर येताना बुलेटप्रूफ काचेच्या संरक्षक आवरणाचा वापर केला होता.
स्पेनमध्ये अटक असलेल्या गोल्डी ढिल्लोंच्या नावाने पोस्ट कोणी केली?
विशेष म्हणजे, गुंड गोल्डी ढिल्लों याला जुलै २०२६ मध्ये स्पेनमधील माद्रिद येथे अटक करण्यात आल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती आणि त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे तुरुंगात असलेल्या गोल्डी ढिल्लोंच्या नावाने सोशल मीडियावर ही पोस्ट नेमकी कोणी प्रसारित केली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बच्चन पिता-पुत्राच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेतला जात आहे.




