#Coronolockdown:लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी पोहचवण्यासाठी ‘लालपरी’ धावणार : अनिल परब
![‘…फासावर लटकवले तरी माघार नाही’; एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/images_1538734598608_st_bus.jpg)
मुंबई : लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे सुरू केली आहे. आता राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, मजुर आणि इतर लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी बसच्या माध्यमातून अशा गरजवंताना घरी पोहचवणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याराज्यातील मजुर आता त्यांच्या गावी पोहचत आहे. अशात आता जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेल्या गरजूंना स्वगृही पोहचवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यात घरी पाठवायचे आहे. मात्र, हे काम अतिशय शिस्तीत होणे आवश्यक आहे. प्ररप्रांतीय लोकांना जशा याद्या तयार करुन त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तश्याच पद्धतीने राज्यातही लोकांना घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. या सर्वांना एसटीच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहचवण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही आराखडा तयार करत आहोत. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या संमतीनंतर हा निर्णय जाहीर करणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. यासाठी एसटी पोर्टल तयार करून यादी बनवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येकाला स्वगृही पाठवण्यात येणार आहे.