#Lockdown: बंदी असतानाही मासेमारी करणाऱ्या दोन एलईडी बोटींवर कारवाई
कोकण किनारपटटीवर पारंपारिक आणि एलईडी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे. पारंपारिक मच्छीमारांच्या आक्रमक भुमिकेनंतर एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करण्यावर बंदी घातली आहे, असे असतानाही बेकायदेशीरपणे एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. यातून अनेकदा मच्छीमारांमध्ये भरसमुद्रात संघर्षाचे प्रकारदेखील घडले आहेत. गेले महिनाभर टाळेबंदीमुळे मासेमारी बंद होती. आता शासनाने मासेमारीवरील निर्बंध शिथील केले असून अटींच्या अधीन राहून मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. काही बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत याचाच फायदा घेत काहींनी एलईडी दिव्याचे साहित्य घेऊन मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरल्या आहेत. यातील दोन बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकांनी हेरल्या. त्यांची तपासणी केली असता बोटींवर एलईडी मच्छीमारीसाठीचे साहित्य आढळून आले. या बोटी व त्यावरील साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. रायगडच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडे केवळ एकच गस्ती नौका असून कर्मचारी संख्यादेखील खूपच कमी आहे. या नौका आणि कर्मचारी संख्या वाढवल्यास बेकायदा मासेमारीला आळा बसू शकेल.
शासनाने नियम व अटींच्या अधीन राहून टाळेबंदीच्या काळात मासेमारीला परवानगी दिली आहे. या बोटींवर नियमांचे पालन होते की नाही यावर आमचे लक्ष आहे. एलईडीव्दारे मासेमारी करणाऱ्या दोन बोटी अलिबागजवळच्या समुद्रात आढळून आल्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती रायगड मत्सव्यवसायाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली.