#CoronaVirus: महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती, एका दिवसात सापडले ७७८ नवे रुग्ण, गाठला सहा हजारांचा टप्पा
राज्यात गुरुवारी करोनाचे ७७८ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. यासोबत राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या ६४२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या २८३ आहे. गुरुवारी १४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ८४० रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.
गुरुवारी झालेल्या १४ मृत्यूंपैकी आठ पुरुष तर सहा महिला होत्या. यामधील दोघांचं वय ६० च्या पुढे होतं. तर नऊ जणांचं वय ४० ते ५९ दरम्यान होतं. तर तिघेजण ४० पेक्षा कमी वयाचे होते. करोनाचा हॉटस्पॉट असणारी आर्थिक राजधानी मुंबईत आणखी ४७८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा ४२३२ वर गेला आहे. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६८ वर गेली आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोना बाधितांचा आकडा वाढतच असून गुरुवारी ४७८ रुग्ण आढळले. त्यापैकी २९७ रुग्णांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतून पालिकेला प्राप्त झाले आहेत. तर ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४७३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णांचा आकडा ३५९३ इतका आहे. तर आणखी २७८ संशयित रुग्ण दाखल केलेले आहेत. मुंबईत ९२, ११२ व्यक्तींचे घरातच अलगीकरण केलेले आहे. त्यापैकी १८, ८०७ लोकांनी आपला १४ दिवसांचा अलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे. तर अजून सुमारे ७४ हजार लोक अजून घरीच अलगीकरणात आहेत.
महाराष्ट्रात ९६ हजार ३६९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलेली असून यापैकी ८९ हजार ५६१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर ६४२७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख १४ हजार ३९८ लोक घऱात विलगीकरणात असून ८७०२ लोक संस्थात्मक विलगीकरणरणात आहेत.