न्यूझीलंडमध्ये तब्बल दीड लाख गाईंची कत्तल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Cow-Vigilantes.jpg)
वेलिंगटन : न्यूझीलंडमध्ये पशूंमधील रोगकारक जीवाणूचे उच्चाटन करण्यासाठी दीड लाख गाईंची कत्तल करण्याची योजना राजकीय नेते व उद्योग धुरीण यांनी जाहीर केली आहे. गाईंची कत्तल करून जीवाणूचा प्रसार त्यापुढे थांबेल याचे कुठलेही पुरावे अजून हाती आलेले नसताना हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी लाखो डॉलर्स खर्च येणार असून मायकोप्लाझ्मा बोव्हिस हा जीवाणू नष्ट करण्याचा हेतू आहे.
न्यूझीलंडची अर्थव्यवस्था ही दुग्धजन्य पदार्थाच्या व्यापारावर अवलंबून आहे. गेल्या जुलै महिन्यात मायकोप्लाझ्मा बोव्हिस हा जीवाणू पहिल्यांदा अमेरिका व युरोपमध्ये आढळून आला होता, त्यामुळे मास्टिसिस, न्यूमोनिया, संधिवात व इतर रोग गाईंना होतात. अधिकाऱ्यांनी सांगितले, की जीवाणू बाधित सर्व गाईंची कत्तल केली जाईल. काही गाईंना मारून त्यांचे मांस काढून घेतले जाईल. काहींना मारून शेतातच पुरून टाकले जाईल. कायदा अधिकारी प्रत्येक शेतात जाऊन तपासणी करतील व गाईंच्या कतलीची प्रक्रिया पूर्ण करतील. २४००० गाईंची आधीच कत्तल करण्यात आली असून आणखी १२८००० गाई मारल्या जाणार आहेत.