निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Uddhav-Thackeray-8.jpg)
निजामुद्दीनसारखे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या निजामुद्दीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मरकजमुळे करोनाचे रुग्ण वाढले. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात महाराष्ट्रातल्या विविध भागातले लोक या मरकजला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे मरकजसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनाचे संकट संपेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही जाती, धर्माचे सण किंवा मेळावे होणार नाही याची काळजी घ्या, प्रसंगी मी स्वतः आयोजकांशी बोलेन असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
करोनाचे संकट जाईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करोना उपाय योजनांचा आढावा घेतला त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.