भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव यंदा साध्या पद्धतीने, सकल जैन समाजाचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/jainsa11.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
संपूर्ण भारतात नावलौकिक मिळविलेला औरंगाबादेतील भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव यंदा ६ एप्रिल रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचे घोंगावत्या सावटामुळे सामाजिक भान व शहराची सुरक्षितता लक्षात घेऊन शोभायात्रा, देखावे, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे, अशी माहिती सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी दिली आहे. सकल जैन समाजांतर्गत सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन दरवर्षी शहरात मोठ्या उत्साहात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करतात. यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यात विविध धार्मिक, सामाजिक संदेश देणारे सजीव, निर्जीव देखावे सर्वांचे आकर्षण ठरतात. या शोभायात्रेतून समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडत असते. यामुळे येथील शोभायात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
मात्र, यंदा कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात व राज्यातही याचे रुग्ण आढळून आले आहेत. सावधगिरी बाळगण्यासाठी राज्य सरकारने यात्रा, शोभायात्रा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सकल जैन समाजाने यंदा भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पैठणगेट येथून निघणारी भव्य शोभायात्रा, महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे. ६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता महावीर चौकातील महावीर स्तंभ येथे धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच विश्वशांतीसाठी समाजबांधव आहे त्याच ठिकाणी सकाळी ९.३0 वाजता णमोकार मंत्राचा जप करणार आहेत. या बैैठकीला समाजाचे कार्याध्यक्ष सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी. एम. बोथरा, उपाध्यक्ष झुंबरलाल पगारिया, ललित पाटणी, सुनील राका, अनिलकुमार संचेती, सुधीर साहुजी, अमोल मोगले, विकास जैन, प्रशांत देसरडा, डी. बी. कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, विलास साहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, जिनदास मोगले मदनलाल आच्छा, रतिलाल मुगदिया, मिठालाल कांकरिया, ऋषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, मुकेश साहुजी, भारती बागरेचा, करुणा साहुजी, भावना सेठिया, सचिव इंदरचंद संचेती, संजय साहुजी, अशोक अजमेरा, रूपराज सुराणा, अजित गोसावी, संजय सेठिया आदींची उपस्थिती होती.