#CoronaVirus: ‘या’ देशात करोना व्हायरसमुळे एकाच दिवसात २५० जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus-precautions1_.jpg)
जगातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. चीन, दक्षिण कोरियाप्रमाणे युरोपातील इटलीला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात असून, मृत्यूचे प्रमाणही इथे जास्त आहे.
शुक्रवारी २४ तासात इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे तब्बल २५० जणांचा मृत्यू झाला. करोनाची लागण झालेल्या देशांमध्ये एकाच दिवसात इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार इटलीमध्ये आतापर्यंत करोना व्हायरसमुळे १,२६६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चीन नंतर आता युरोप करोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमुख केंद्र बनला आहे. कोरना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतार्यंत करोनामुळे कर्नाटक आणि दिल्ली या दोन राज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८० पेक्षा जास्त आहे. चीनपेक्षा आता युरोपमध्ये रोजच्या रोज करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. करोना व्हायरसवर अजूनही लस बनवता आलेली नाही. वैज्ञानिकांना ही लस बनण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागू शकतात.