मुंबईच्या ओला ड्रायव्हरलाही कोरोना संसर्ग; पुण्यात रुग्णांची संख्या 5 वर
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरात दुबई येथे जाऊन आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना मुंबईहून पुण्यात घेऊन येणारा ओलाचा चालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरस पोहोचला आहे. पुणे शहरात कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण झाले आहेत. या रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मूळ शहरात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.