राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी अखेर मान्य,पाच दिवसांचा असणार आठवडा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-81.png)
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने नव्या वर्षात मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २९ तारखेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे दोन दिवस सुटी असेल. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1579923266.jpg)
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली जात होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसोबतच ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी होती. पण राज्य सरकारने त्यावर निर्णय घेतला नव्हता. अखेर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी याच महिनाअखेरपासून होणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/assam_govt.png)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असते. इतर सर्व शनिवारी त्यांना नेहमीप्रमाणे काम करावे लागते. पण आता महिन्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवार कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुटी असेल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यावेळेत कामावर असतील. पाच दिवसांच्या आठवड्याच्या मोबदल्यात आता प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना रोज ४५ मिनिटे जास्त वेळ काम करावे लागणार आहे. सव्वा नऊ ते सव्वा सहा या वेळेत प्रत्येक कर्मचाऱी आणि अधिकाऱ्याला काम करावे लागेल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/kerala-govt-office-manorama-archive.jpg)