सुमीत वाघमारे हत्या : पत्नी भाग्यश्री आणि कुटुंबाला जामीनावर असलेल्या आरोपींकडून धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Beed.jpg)
बीड | बीडमधील सुमीत वाघमारे हत्याकांडातील पीडित भाग्यश्री वाघमारेला आरोपींकडून धमक्या येत आहेत. गुन्ह्यातील आरोपी सध्या जामीनावर बाहेर असून भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबीयांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. या घटनेला आता एक वर्ष उलटलं असलं तरी सुमीत वाघमारेची पत्नी आणि त्याचं कुटुंब दहशतीखाली आहे.
डिसेंबर 2018 साली बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. प्रेमविवाह केल्याच्या रागातून आरोपीने सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याचा दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. बालाजी लांडगेसह काही आरोपींनी खून केला होता. सुमीत वाघमारे या तरुणाची महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हत्या करण्यात केली होती.
या गुन्ह्यातील दोन आरोपी गजानन क्षीरसागर आणि कृष्णा क्षीरसागर हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. दोघेही गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारेने केला आहे.
दरम्यान वाघमारे कुटुंबाने या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही भाग्यश्रीला न्यायालय परिसरामध्ये शिवीगाळ झाली होती. त्यानंतर भाग्यश्रीसह वाघमारे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.