पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरुन डावलले
महापालिका जनसंपर्क विभागाचा भोंगळ कारभार; विरोधी पक्षनेत्यांकडून आयुक्तांना पत्र
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटने करण्यात येतात. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना जाणूनबुजून डावलण्यात येत आहे. यावरुन विरोधी पक्षनेत्यांनी राजशिष्टाचाराची आयुक्तांना आठवण करुन देत पालिका जनसंर्पक अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून होवू लागली आहे.
विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटने करण्यात येतात. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार पुण्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार, मनपाचे पदाधिकारी, त्या-त्या प्रभागात स्थानिक नगरसदस्यांची नावे निमंत्रण पत्रिकेवर टाकणे आवश्यक आहे.
राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आहे. तरीही महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याचे नाव टाकले जात नाही. ही खेदाची बाब आहे. राज्यात जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा गिरीश बापट पुणे जिल्हाचे पालकमंत्री झाले. तेव्हा मनपामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सत्ता होती. तेव्हा मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत गिरीश बापट यांच्या नावांचा कायम समावेश केला होता.
दरम्यान, महापालिकेत सत्ताधारी भाजप पदाधिकारी हे पालकमंत्र्याचे नाव मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत समावेश करण्यास टाळत आहेत. यापुढील प्रत्येक मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत राज राजशिष्टाचारानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांचे नांव टाकण्यात यावे. तसेच मनपाचे विविध प्रकल्पांच्या भूमिपूजने, उद्घाटने, विविध कार्यक्रमाची निमंत्रणे पालकमंत्र्यांना पाठवावीत आणि राजशिष्टाचाराचे पालन करावे, अशी मागणी काटे यांनी केली आहे.