आजोबाचा नातीवर लैंगिक अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/rape-child.jpg)
चंद्रपूर | महाईन्यूज
आजोबानेच आपल्या अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना ब्रम्हपुरी परिसरात बुधवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी ६७ वर्षीय आजोबावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पहिल्या वर्गात शिकत असलेल्या नातीवर अत्याचार केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या नराधम आजोबाला ब्रम्हपुरी पोलिसांनी काल बुधवारी रात्री गावातून अटक केली आहे.
आरोपीच्या मुलाची पत्नी मरण पावल्यामुळे त्यांच्या मुलाने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबत तो नागपूर येथे राहत होता, तर मुलाची मुलगी ही आईच्या मृत्यूनंतर मामाकडे राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी या नराधम आजोबाने आपल्या गावी नातीला शिकवण्यासाठी मामाकडून आणले होते. शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात तिचा प्रवेश घेण्यात आला. त्यानंतर विकृत मनोवृत्तीच्या आरोपी आजोबाने नातीवर अत्याचार केला. दरम्यान, सदर बाब शाळेत खिचडी शिजवणाऱ्या बाईला कळताच तिने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांना कळवले. मुख्याध्यापकांनी ही घटना गावातील पोलीस पाटलांना सांगितली. पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.