breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुटखाबंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश …

 राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर गुटखाबंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपमुखयमंत्र्यांनी दिले आहे. ज्याक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल, तिथल्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन तसंच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात, उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल (5 फेब्रुवारी) मंत्रालयात बैठक झाली. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

आघाडी सरकारच्या काळात राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली, त्याची कडक अंमलबजावणीही झाली. त्यामुळे गुटखाकंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलिकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जात आहे. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल पकडलाही जातो आणि वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही. गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मोक्का’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन, पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी  दिला.

राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. गुटखा विक्रीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला निधी वाढवून देण्याचंही त्यांनी मान्य केलं. गुटखाबंदीबाबत जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button