नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे ‘ते’ अधिकारी सीबीआयच्या रडारवर
![PNB allowed to seize Nirav Modi's assets worth Rs 400 crore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nirav-modi-2.jpg)
मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणेकडून आता नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयकर विभागाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष सुशील चंदा यांचीही चौकशी होणार आहे. सुशील चंद्रा मे महिन्याच्या अखेरपर्यंत निवृत्त होणार आहेत. मात्र चौकशी सुरू करायची असल्याने त्यांना अद्याप निवृत्तीबद्दल कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
पीएनबी कर्ज घोटाळा समोर आल्यानंतर आयकर विभागाने नीरव मोदीच्या शोरुम आणि घरांवर धाडी टाकल्या. यावेळी नीरव मोदीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती अधिकाऱ्यांच्या हाती लागली. मात्र आयकर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांची चुकीची आकडेवारी अहवालात दिली, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली. नीरव मोदीच्या संपत्तीचे मूल्यांकनदेखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. पीएनबी घोटाळा प्रकरणाचा तपास करताना ही बाब सीबीआयच्या लक्षात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयच्या मुख्यालयाला दिलीच नाही. याशिवाय सीबीआयचा एक वरिष्ठ अधिकारीही रडारवर आहे. याच तपासाचा भाग म्हणून सीबीआयच्या पथकानं सोमवारी मुंबईत येऊन आयकर विभागाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतलं. सीबीआयनं नीरव मोदी प्रकरणात 14 मे रोजी सीबीआय न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये नीरव मोदीसह 24 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. यामध्ये अलाहाबाद बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रमण्यम यांच्या नावाचाही समावेश आहे.