चांगल्या पर्जन्यमानासाठी गुजरात सरकार करणार ‘पर्जन्य यज्ञ’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rain-1-5-1.jpg)
नवी दिल्ली : एकीकडे देशातील जलसाठे कोरडे पडत आहेत. तर दुसरीकडे गुजरात सरकार चांगल्या पावसासाठी ‘दैवी कृपा’ प्राप्त करण्यासाठी ‘वैदिक’ काळात वापरण्यात येणाऱ्या मार्गाचा अवलंब करणार आहे. चांगल्या पावसासाठी गुजरातमधील रूपाणी सरकारने ३१ मे रोजी ३३ जिल्ह्यात ४१ ‘पर्जन्य यज्ञ’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर राज्यातील ८ प्रमुख शहरांमध्ये इंद्र देव आणि वरूण देवाला खूश करण्यासाठीही यज्ञाचे आयोजन केले जाणार आहे. गुजरात सरकारद्वारा एका महिन्यासाठी चालवण्यात येत असलेल्या ‘सुजलाम सुफलाम जल अभियान’चा समारोप ‘पर्जन्य यज्ञ’द्वारे केला जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नदी, तलाव, कॅनल आणि जल साठे खोलीकरणाचे काम केले जाणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या अभियानाच्या सांगतावेळी यज्ञ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने चांगल्या पावसासाठी ३१ मे रोजी पर्जन्य यज्ञाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा यज्ञ संपूर्ण गुजरातमध्ये ४१ ठिकाणी होणार आहे. यज्ञ समाप्तीनंतर प्रसादाचे वितरणही केले जाणार आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या यज्ञात सहभागी होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली.