उस्मानाबादमध्ये साजरा केला गाढवांचा वाढदिवस, कारण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/11-9.jpg)
उस्मानाबाद |महाईन्यूज|
गावा-गावात वाढदिवस साजरा करताना मित्रांसोबत जाऊन चौकात केक कापण्याचा ट्रेंड वाढला आहे. हा ट्रेंड मोठ्या शहरापासून छोट्या शहरांपर्यंत पोहचला आहे. असे करताना चौकात धिंगाणा केला जातो, तसेच फटाके फोडले जातात. कोणाच्या वैयक्तिक वाढदिवसाचा सर्वसामान्यांना त्रास होतो, हे वाढदिवस साजरे करणारे विचारही करत नाही. अशा उत्साही वाढदिवस साजरे करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी उस्मानाबाद येथील काही तरुणांनी एक नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क गाढवांचा वाढदिवस साजरा करून दिवसागणिक चौकात साजरे होणारे वाढदिवसांची मालिकाच खंडीत पाडली आहे. त्यांच्या या अभिनव कल्पनेचे सर्वांकडून कौतुक होत आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पूर्वी वाढदिवस हे क्वचितच साजरे केले जात होते. पण सोशल मीडियामुळे वाढदिवस साजरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तान्हा बाळापासून ते वयोवृद्ध आजोबांचा वाढदिवस साजरा करून फोटो सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याची चढाओढ लागलेली असते. सध्या वाढदिवस म्हटल्यावर बॅनरबाजी, ठिकठिकाणी केप कापणे. त्यात काही जण तर चक्क तलवारीने केक कापतात. पण अशा उत्साही मित्रांमुळे सार्वजनिक ठिकाणी त्रास होते याची जाणीव तरूणांना नसते.
आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाचा वाढदिवस कधी आहे हे लगेच कळते. त्यामुळे त्या व्यक्तीवर शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर होतो. अनेक पोस्ट टाकून मित्र आणि नातेवाईक त्या व्यक्तीला शुभेच्छा देतात. पण हा वाढदिवस समजल्यावर काही उत्साही मित्र आपल्या आवडत्या मित्राचा वाढदिवस चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतात. असा काहीसा प्रकार दररोज खाजा नगर भागातील शम्स चौक भागात होत होता. येथे फटाके वाजवले जात होते, तसेच तरूण पोरं धिंगाणा घालत होते. यामुळे या चौकातील व्यावसायिक हैराण झाले होते. अशा त्रासाला कंटाळून येथील काही तरूणांनी एक आयडीयाची कल्पना लढवली.
उस्मानाबाद येथील तरूणांनी शहरी भागात फिरणारे दोन गाढव चौकामध्ये आणले, त्यांना फुगे लावले, त्यांच्यासमोर केक देखील कापला आणि सर्वांनी मिळून या गाढवांचा वाढदिवस साजरा केला. गाढवांचा वाढदिवस साजरा केला केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. आपणही या चौकात वाढदिवस साजरा केला तर गाढव आणि आपल्या फरक काय आणि या विचाराने या चौकात साजरे होणारे वाढदिवस गाढवाच्या वाढदिवसानंतर बंद झाले.