Corona Virus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालय
बीजिंग | महाईन्यूज
चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 830 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. चीनमध्येकोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं असून याचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
चीनमधील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. 25 हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे. रुग्णालय उभारण्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. याआधी 2003 साली चीनने सार्सचा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांच्या आत रुग्णालय उभारलेले होते.