हिंजवडीत शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/12-5.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी
ओळख झाल्यानंतर महिलेशी फोनवरून जवळीक साधली. त्यानंतर लग्नाची मागणी करून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. बावधन, पौड, सिंहगड रोड, शिवतीर्थनगर, कोथरूड येथे २००७ ते २ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर वसंत कर्नाटकी (रा. कोथरूड), सतीश बोरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित महिलेशी नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ओळख झाली. तिथे त्याने महिलेचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर महिलेशी मोबाइलवरून जवळीक करून लग्नाची मागणी घातली. त्यासाठी महिलेने नकार दिला. त्यामुळे पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्याशी लग्न करणार असल्याचे आरोपीने आश्वासन दिले. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना बावधन येथे एक फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे महिलेला नेऊन त्यांना गुंगीचे औषध देऊन जबरदस्ती करून त्यांच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर, वेळोवेळी बावधन येथील फ्लॅटवर येऊन शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने पीडित महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा तयार केलेला व्हिडिओ दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याआधारे पीडित महिलेवर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला. यात पीडित महिला गरोदर राहिली. त्यांचा गर्भपात केला. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला कोथरूड येथील कार्यालयावर बोलवून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले. त्यासाठी देखील महिलेने नकार दिला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन स्टॅम्प पेपरवर सही करण्यास भाग पाडले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.