इन्फोसिसचे शेअर्स तेजीत; नफ्यात झाली 23.5 टक्क्यांची वाढ!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Infosys.jpg)
बंगळूर | माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीच्या समभागामध्ये सोमवारी (ता.13) शेअर बाजार सुरु होताच तेजी दिसून आली. कंपनीचा अपेक्षेपेक्षा चांगला लागलेला तिमाही निकाल आणि कंपनीमध्ये गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यांनतर समभागामध्ये तेजी दिसून आली.
इन्फोसिसच्या समभागाने सोमवारी सकाळच्या सत्रात 4.50 टक्क्यांची उसळी 777 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर इन्फोसिसचा समभाग 35.15 रुपयांनी वधारून 773.40 रुपयांवर व्यवहार करीत स्थिरावला.
इन्फोसिसने नुकतेच तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 23.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीला तिमाहीत 4 हजार 457 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच, कंपनीने ताळेबंदात फेरबदल केल्याच्या आरोपांची तपासणी लेखापरीक्षण समितीने केली असून, या आरोपात समितीला काही तथ्य आढळून आले नसल्याचे इन्फोसिसने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून आणि स्वतंत्र समितीने चौकशी केली. त्यानंतर कोणत्याची प्रकारची अयोग्य कृती कंपनीच्या वरिष्ठांकडून झाली नसल्याचे इन्फोसिसचे लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष डी. सुंदरम यांनी म्हटले आहे.