कोलकाता नाईट रायडर्स क्वालिफायर-2 मध्ये सहभागी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/kkr-2-6.jpg)
- आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा : एलिमिनेटर फेरीची लढत
कोलकाता – दिनेश कार्तिकची कर्णधाराला साजेशी खेळी आणि शुभमन गिल व आंद्रे रसेल यांच्या साथीत त्याने केलेल्या बहुमोल भागीदारीमुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाला राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 20 षटकात 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 144 धावा बनवू शकला. अशाप्रकारे कोलकाता 25 धावांनी जिंकत क्वालिफायर-2 मध्ये दाखल झाले.
नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 169 धावांची मजल मारली होती.
ऑफस्पिनर कृष्णाप्पा गौतमने डावातील पहिल्या व तिसऱ्या षटकांत सुनील नारायण (4) आणि रॉबिन उथप्पा (4) यांना परतवून राजस्थानला सनसनाटी प्रारंभ करून दिला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने नितीश राणाला (3) बाद करीत कोलकाताची 3 बाद 24 अशी घसरगुंडी घडवून आणली. कार्तिकच्या साथीत 27 धावांची भर घातल्यावर ख्रिस लिनला बाद करीत श्रेयस गोपालने कोलकाताची 4 बाद 51 अशी अवस्था केली. लिनने 22 चेंडूंत 2 चौकारांसह 18 धावांची उपयुक्त कामगिरी केली. अशा बिकट वेळी दिनेश कार्तिकने युवा फलंदाज शुभमन गिलच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 6.2 षटकांत 55 धावांची बहुमोल भागीदारी करीत कोलकाताचा डाव सावरला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 10 षटकांत 1 गडी बाद 87 धावा अशी मजल मारली होती. त्यावेळी त्यांना विजयासाठी 83 धावांची गरज होती. राजस्थान सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही.
अजिंक्य रहाणे 46 आणि संजू सॅमसनने 50 धावा बनविल्या होत्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारीही रचली, पण त्यासाठी जास्तीचे चेंडू खर्ची घातले. निर्णायक वेळी यांच्या विकेट्स पडल्यामुळे राजस्थानच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला.