धोनी लवकरच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता…

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. CNN News18 ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी धोनी लवकरच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे विधान केले आहे. पण, तो ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
धोनी वन डे क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेईल, असे संकेत देताना शास्त्री म्हणाले की,”धोनी अनेक वर्ष तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्यानं 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो वन डे क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर या वयात तो ट्वेंटी-20 खेळणे पसंत करेल. त्यासाठी त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागेल.”असही ते म्हणाले…

धोनीचं ट्वेंटी-20 करिअर अजूनही जीवंत आहे का, हा प्रश्न विचारला असता शास्त्री यांनी सांगितलं की ,”इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो खेळणार आहे. धोनी कधीच स्वतःला संघावर लादणार नाही, हे मी त्याच्याबाबतीत स्पष्टपणे सांगू शकतो. आता आपण खेळू शकत नाही असं जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो कसोटीप्रमाणे निवृत्ती जाहीर करेल. तो भरपूर क्रिकेट खेळला आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो ट्वेंटी-20 त खेळत राहिल.”त्यामुळे धोनीने वन डे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली तर त्याचे चाहत्यांचा नक्कीच हिरमोड होईल…





