तामिळनाडूत स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात हिंसक आंदोलन; 11 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/tamilnadu-.jpg)
चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ज्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, यामध्येच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. कंपनीच्या विस्ताराचे वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चालले आहे. या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण लागले आणि यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे राजकारण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू होणे हे राज्य पुरस्कृत दहशतवादाचे उदाहरण आहे, असे ट्वीट त्यांनी केले. तर तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली.
आंदोलन अचानक हिंसक झाले आणि गाड्यांची तोडफोड करत जाळपोळही करण्यात आली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, ज्यानंतर वातावरण अधिकच बिघडलं. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अकरा जणांचा मृत्यू झाला. वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. मद्रास हायकोर्टाने सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत, तर हिंसाचारानंतर पोलिसांनी राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू केले आहे.